
मनोगत
नमस्कार, मी अनंत रामचंद्र कालेलकर, पेशाने शिक्षक पण शिकवण्याला मी पेशापेक्षाही माझा धर्म, माझा श्वास मानलं.
शिक्षणाचा मूळ उद्देश एक उत्तम परिपूर्ण माणूस निर्माण करणं हे मी ब्रीद म्हणून आयुष्यभर जपलं. ह्या माझ्या ३०-३२ वर्षाच्या शैक्षणिक कारकीर्दीमध्ये जे काही मला शिकायला मिळालं , पाहायला मिळालं ते कधीतरी कागदावर उतरवावं असं मला नेहमी वाटलं आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा जमलं तेव्हा लेखणी हातात घेतली.जसं सुरवातीला म्हटलं की माझा पेशा शिक्षकाचा असला तरी माझ्यात एक पत्रकार आणि कवीही दडलाय. मग वर्तमानपत्रातून स्थंभलेखनही सुरु केलं तेही माझ्या आवडत्या विषयावर अर्थातच शिक्षणावर. दै.नवाकाळ मध्ये १३ वर्षे हे स्थंभलेखन चालू होतं मग दै.महाराष्ट्र टाइम्स आणि मग दै.मुंबई सकाळ. दरम्यान मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघाने माझ्या शिक्षक चळवळी वरील लेखांवर आधारलेलं पाहिलं पुस्तक प्रकाशित केलं, माझं पहिलं पुस्तक ‘शिक्षक चळवळ’ आणि ही पुस्तकांची मालिका सुरु झाली. मग माझी शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रा बद्दलची मतं ,’शिक्षण: मते आणि विचार’ च्या रूपाने बाहेर आली तर कधी आमच्या पार्ल्याच्या सिरूर बालकाश्रमामध्ये सहाय्यक अधीक्षक म्हणून आलेले अनुभव,’माझं होम -माझी मुलं’ च्या रूपाने. शिक्षकाने खूप फिरायला पाहिजे तरच विद्यार्थ्यांना ते पाठ्यपुस्तका बाहेर नेऊन शिकवू शकतात अशा मताचा मी आपला हा सुजलाम सुफलाम देश बघितल्याशिवाय कसा राहणार.जसा जमेल तसा हा देश बघितला आणि तेच ,’सारे जहां से अच्छा -भटकंती भारताची मध्ये कागदावर उतरवलं?
आज ही माझी पुस्तकं त्याच्या प्रती संपल्यामुळे अगदी प्रकाशाकांकडेही उपलब्ध नाहीत. पण नव्या पिढी पर्यंत माझे विचार पोहचावेत म्हणून नव्या तंत्राची कास धरून माझ्या पुस्तकाचं संकेतस्थळ अर्थात website बनवण्याचा मी निर्णय घेतला. आपल्याला जर ही पुस्तकं आवडली तर जरूर कळवा. मी ह्या ठिकाणी माझे सगळे संपादक ज्यांनी मला स्थंभ लेखानाची संधी दिली, माझे सगळे प्रकाशक ज्यांनी माझी पुस्तकं प्रकाशित केली त्यांचे आभार मानतो. पण ज्या तीन व्यक्ती ज्यांच्यामुळे हे शक्य झाले त्यांचे नाव घेतल्याशिवाय मी माझं आभार प्रदर्शन पूर्ण करू शकत नाही. ज्यांच्या अबोल त्यागामुळे,अमोल सहकार्यामुळे,आणि असीम सोशिकतेमुळे मी जे काही थोडाफार लिहू शकलो त्या माझ्या अर्धांगिनीस सौ.सुमतीस आणि माझी मुलं सुहास आणि शुभास प्रेमपूर्वक अर्पण.
ग्रंथसंपदा
Video Song
गीतकार: श्री अनंत कालेलकर
स्वर: श्री. सुरेश वाडकर
संगीत: श्री. अशोक पत्की
अल्बम: सप्त सूर माझे